
35 वर्षांनंतर पुणे–मुंबई महामार्गावर पुन्हा भीषण वाहतूक कोंडीचा अनुभव
पुणे–मुंबई महामार्गावर 90 च्या दशकात एखादा मोठा अपघात झाला की दोन-दोन दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा. तब्बल 35 वर्षांनंतर आज पुन्हा एकदा महामार्गाने तोच अनुभव नागरिकांना दिला.

महामार्गावर गॅस वाहून नेणारा कंटेनर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ वाहतूक थांबवण्यात आल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून या रांगा तब्बल 20 ते 30 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या.
या घटनेमुळे हजारो वाहने महामार्गावर अडकली. प्रवाशांना तासन्तास वाहनातच थांबावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, आपत्कालीन सेवा आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. गॅस गळतीमुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.

दरम्यान, पोलिस यंत्रणेकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच परिस्थिती सुरळीत होईपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादित ठेवण्यात आली होती.
अखेर सलग 30 तासांच्या प्रयत्नांनंतर गॅस कंटेनर हटवण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत होऊ लागली. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




Comments