
पवना डॅम अल्पवयीन अत्याचार प्रकरण पीडित मुलीच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली प्रशासनाची बैठक लोणावळा
पवना डॅम अल्पवयीन अत्याचार प्रकरण पीडित मुलीच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली प्रशासनाची बैठक लोणावळा | दि. ८ मे २०२६ मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या प्रकरणात ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, पीडित मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पीडितेला मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीडितेच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना पोक्सो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीडित मुलीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून महिला दक्षता समितीसोबत स्वतंत्र महिला कोअर टीम स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या टीममध्ये महिला लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय तालुक्यातील सुमारे २५ हजार ‘लाडक्या बहिणींना’ या उपक्रमाशी जोडून महिलांच्या सुरक्षेबाबत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. समुपदेशन व शासकीय योजनांचा लाभ भरोसा सेल आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटरमार्फत पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासोबतच आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. समुपदेशनासाठी MSW पदवीधर महिलांची नियुक्ती करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. पूर्वीच्या घटनांचाही आढावा डॉ. गोऱ्हे यांनी विसापूर येथील घटना तसेच रस्त्यातून मुलीला उचलून नेण्याच्या प्रकरणाचाही आढावा घेतला. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून लवकरच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर नेहा ठाकूर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी अधिकारी उपस्थित होते.





Comments